मोदींचे चोरून चित्रीकरण प्रकरणी आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा मोबाइल जप्त

0

जळगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे दौऱ्यावर आले असताना जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी काही जणांनी मोदी यांचे पाइपमधून चोरून चित्रीकरण केले. विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी आणि जळगाव पोलीस यांचा बंदोबस्त असताना देखील अशा पद्धतीचे चित्रीकरण होणे म्हणजे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्हा पोलिस प्रशासन आणि गुप्तचर विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी मंत्री आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मोबाइल जप्त केले असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री धुळे दौऱ्यासाठी विमानाने ते जळगावात दुपारी १.५० वाजता दाखल झाले होते. या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस अधीक्षकांनी बोलावून चौकशी केली. विमानतळाच्या पहिल्या केबिनमध्ये भिंतीलगत विद्यमान मंत्री व आमदारांचे काही स्वीय सहाय्यक व वाहनचालक उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ आणि फोटो घेतले. या सर्व स्वीय सहाय्यक आणि चालकांचे मोबाइल जळगाव पोलिसांनी तपासकामी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता बंद असल्याचे सांगण्यात आले. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतरांच्या मोबाइलमधील सर्व व्हिडीओ ताब्यात घेतले आहे. त्यात पाइपजवळ मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत असलेली व्यक्ती जामनेर येथील अभिषेक नामक असल्याचे समजते.

व्हिडिओ मधील संवाद
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडीओ तयार करणाऱ्यांमध्ये संवादही सुरु आहे. मोबाईल व्यवस्थित घ्या, वर घेऊ नका..स्वप्नील भाऊ कोणाला त्रास व्हायला नको.. गडकरी साहेब आले..फडणवीस साहेब भी आहे रे भो… अरे मोदी साहेब येताहेत अजून… राज्यपाल साहेब येतात… मोदी साहेब नाहीत… दिसलं का रे पगारे भाऊ… अजून दिसलं नही तुले… काळ्या कपड्यावर दिसत नाही का तुले… बरं… बरं… एन्ट्री होतेय… राज्यपालांच्या बाजुला आमदार, एस. पी. साहेब… असे म्हणत असतानाच मोदी विमानातून बाहेर येतात… तेव्हा आला रे बाप… टायगर आला टायगर असे संवाद या व्हिडीओत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.