मुंबई : राज्यात तसेच मुंबईत कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही अंशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा या लोकलसेवेवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याचे संकेत दिले आहेत. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेसारखे लोकल सेवेला जे निर्बंध घातले होते ते पुन्हा घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यातील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत व्यापारावर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची जोरदार मागणी करत सलग दुसऱ्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे येत्या दोन दिवसांत काही निर्बंध शिथिल करण्याचे किंवा त्यात सुटसुटीतपणा आणण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापारी संघटनांबरोबरच्या बैठकीत दिले. त्यामुळे दोन दिवसांत व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, अंबरनाथ, पुणे, नांदेड , लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि नाशिकमध्ये पुन्हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. राज्यात सध्या ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून नवीन साठा १७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहे, यावेळी ७० हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.