मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी अपेक्षेप्रमाणे रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. त्यामुळे ६ टक्क्यांवर असणारा रेपो रेट आता ५.७५ इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो दर हा 5.50 टक्के तर बँक रेट 6 टक्के इतका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.. त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कार्यकाळात झालेली ही सलग तिसरी व्याजदर कपात ठरली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात झाली होती. याचा अर्थ गेल्या सहा महिन्यांत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट एकूण ०.७५ टक्क्यांनी घटवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक पार पडली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे या पतधोरणात व्याजदरात कपात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा अखेर खरी ठरली असून त्यामुळे उद्योग जगतामध्ये सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जांचे हप्ते स्वस्त होण्याची शक्यता असल्याने सामान्यांनाही मोठा दिलासा मिळेल. मात्र, या रेपो रेटच्या कपातीनंतर बँका प्रत्यक्षात आपले व्याजदर किती प्रमाणात कमी करणार, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.