जळगाव (प्रतिनिधी) । येथून जवळ असलेल्या कुसुंबा विमानतळ जवळ दोन मोटारसायकलींची समोरा-समोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. प्रितेश सुरेश रायपुरे (वय-४४,रा. सुप्रीम कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून विकास चंपालाल बारेला असे अपघातातील जखमीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितेश रायपुरे हा आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ एवाय ८६२६) हा दुचाकीने कामानिमित्त विमानतळसमोरून जात असतांना समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रितेश रायपुरे याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील विकास बारेला हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. मयत प्रितेशचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच सदर ठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, निलेश पाटील, मुदस्सर काजी, असीम तडवी, कुसुंबा पोलीस पाटील राधेश्याम पाटील अशांनी जखमीला उपचार कामी ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे रिक्षामध्ये टाकून पाठवले होते. पुढील कारवाई पो.कॉ. रतिलाल पवार करीत आहे.