जळगाव । शहरासह जिल्ह्यातील तापमानात आता दिवसागणिक वाढ होत असून, सकाळपासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. २५ रोजी यंदाचे सर्वाधिक 46.31 अंश तापमानाची नोंद झाली असून एप्रिल महिन्यात मे हिट तडाख्याचा अनुभव जळगावकर घेत आहे. या वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर भर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे.
दुसरीकडे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराच्या तापमानाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४५ अंश सेल्सिअसच्या वर मजल मारली आहे शहरात आज २५ एप्रिल रोजी चे कमाल तापमानाची नोंद ४५. १ .तर किमान ३०. ३ तर ४९ आद्र्रता नोंद करण्यात आली आहे . दिवसेंदिवस या वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठेवर या तापमानाचा परिणाम दिसून येत आहे .
जळगावकरांना सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत. नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घेत आहेत. मे महिन्यातील तापमान एप्रिलमध्येच अनुभवत आहेत. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली होती. एप्रिलमध्ये देखील दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून आज 46.31 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून यापासून बचाव करण्यासाठी थंडगार पाणी, आईस्क्रिम, ऊसाचा रस, लिंबूपाणी, गोला यांचा आसरा घेतला जात आहे. सायंकाळनंतर शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.