मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण तापीतिरी दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समितीतर्फे सोपानकाका समाधी सोहळा मंगळवार, दि. १७ ते दि. २४ डिसेंबर २०१९ दरम्यान प्रारंभ झाला आहे.
सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी भावकथा होणार असून प्रवक्ते हभप अर्जुन महाराज खाडे श्रीक्षेत्र आळंदी येथील आहेत. १७ रोजी जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप संजय महाराज देहूकर यांचे हस्ते कलशपूजन तर संस्थानचे अध्यक्ष हभप रामराव महाराज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सप्ताहात पहाटे काकडाआरती, ८ ते १० विष्णूयाग, सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ५ ज्ञानेश्वर पारायण, सायंकाळी हरीपाठ तर रात्री ८.३० वाजता कीर्तन होईल. यज्ञ होमहवन शारंगधर महाराज व अतुल महाराज या पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने होणार असून अरूण धांडे, महेश धांडे, जगदीश महाराज सहकार्य करतील. १७ रोजी ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदारवाडी, १८ रोजी आचार्य अर्जुन महाराज लाड गुरूजी, १९ रोजी ज्ञानेश्वर माऊली शिंदे श्रीक्षेत्र आळंदी, २० रोजी हरीदास महाराज शिंदे सोलापूर, २१ रोजी पंडित महाराज कोल्हे त्र्यंबकेश्वर, २२ रोजी सकाळी प्रकाश महाराज जवंजाळ चिखली तर रात्री प्रविण महाराज गोसावी पैठणकर, २३ रोजी चैतन्य महाराज देगलूरकर श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन तर २४ रोजी सकाळी १९ वाजता जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप चैतन्य संजय महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर तांदलवाडी ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.