मेगा भरतीच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा युृ-टर्न !

0

मुंबई : मेगा भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला, या विधानावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. भाजपामध्ये इतर पक्षांतून जे नेते आले त्यामुळे पक्षाचा फायदाच झाला. जे आले त्यांचा मला अभिमानच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांआधी इतर पक्षांतून भाजपात जी मेगाभरती झाली त्याबददल मी कधीही खंत व्यक्‍त केलेली नाही. माझ्या वक्‍तव्यांचा प्रसारमाध्यमांकडून विपर्यास करण्यात आला, असे पाटील म्हणाले.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू झाली आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठया प्रमाणात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आले. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय, रणजितसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक-संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर आणि वैभव पिचड, पद्मसिंह पाटील-राणा जगजितसिंह आदी अनेकांचा समावेश होता.

पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी भाजपातील मेगाभरतीबददल केलेल्या विधानानंतर गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेउन याबाबत स्पष्टीकरण दिले. माझ्या वक्‍तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, इतर पक्षांतून जे नेते भाजपात आले त्यांचा मला अभिमानच आहे. छत्रपती उदयनराजे भोसले असतील, संभाजीराजे छत्रपती असतील त्यांचा अभिमानच आहे.

दरम्यान, तिकिटवाटपात जुन्या निष्ठावंतांना डावलण्यात आले या आरोपातही काही तथ्य नाही. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही 164 तिकिटे वाटली. त्यापैकी 27 बाहेरून आलेल्यांना दिली. पण इतर सर्व तिकिटे ही भाजपासाठी वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्यांनाच दिल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 27 पैकी जे निवडून आले नाहीत ते देखील आज भाजपासोबतच आहेत त्यांनी इतर कोणताही विचार केलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.