खामगाव – गेरू माटरगाव वन्यजीव अभयारण्यात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले गजानन मानिकराव पोटे यांना मेंढपाळाकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराला वनविभागातील काही अधिकारी, कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप वनरक्षक पोटे यांनी केला आहे.

याबाबत गजानन पोटे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला १४ जून रोजी तक्रार दिली. त्यामध्ये नमुद केल्यानुसार, गजानन पोटे हे १३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गेरू येथे आपल्या शासकीय निवासस्थानात असताना मेंढपाळ रंगा ठोंबरे रा.नांद्री याने पोटे यांच्या निवासस्थानी येवून तु आमचे नावाचा रिपोर्ट व मेंढरे चारण्याचे फोटो काढून साहेबांना का पाठविले असे म्हणून तु गावात कसा राहतो याचा विचार कर अशी धमकी दिली.
यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेनंतर रात्री गजानन पोटे हे स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालय येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यासाठी पत्नी, मुलाबाळांसोबत आले होते. यावेळी पोटे यांनी मेंढपाळ रंगा ठोंबरे याच्यासोबत आपल्याच विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याने सदर प्रकार घडला आहे, त्यामुळे याचा शोध घेवून संबंधितांविरूध्द कारवाई करण्यात यावी अन्यथा येथेच तळ ठोकून बसेल अशी आग्रही भुमिका घेतली होती. मात्र अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर ते परत निघून गेले.
काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप
यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांशी बोलताना गजानन पोटे यांनी सांगितले की, मी वन्यजीव विभागात कार्यरत असून वन्यजीव अभयारण्याच्या लगत असलेल्या वनपरिक्षेत्रात मेंढ्या चरत असल्याबाबतचा फोटो काढून विभागाच्या मिशन ज्ञानगंगा नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर टाकून वरिष्ठांना माहिती दिली. तर सदर फोटो व माहिती दिल्यानंतर एका तासाच्या आत रंगा ठोंबरे याला कळाले व त्याने निवासस्थानी येवून धमकी दिली. याचाच अर्थ या ग्रुपमध्ये असलेले वनविभागाचेच काही अधिकारी व कर्मचारी रंगा ठोंबरे याच्यासोबत मिळालेले असून त्यांनीच त्याला मी वरिष्ठांना मेंढ्या चरतानाचे फोटो व माहिती दिल्याचे कळविले. त्यामुळे त्यांचा शोध घेवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुध्दा पोटे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.
