चोपडा, दि.6 –
तालुक्यातील वेले येथील माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश एकनाथ कोळी (42)यांनी आज दुपारी तीन वाजेपूर्वी मुलाला टोकरे कोळी सर्टीफिकेट व व्हॅलीडीटी मिळत नसल्याने आत्महत्या केली असून मयतापूर्वी त्यांनी तशी चिठ्ठी लिहली आहे.
गुरूवारी दुपारी 3 वाजेपूर्वी सुरेश कोळी यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकला दोरी बांधून आत्महत्या केली होती. चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील नीलकंठ कंखरे याच्या फिर्यादी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुरेश कोळी यांची पत्नी शिलाबाई कोळी या चोपडा नगरपालिकेच्या अंतर रुग्णालयात या आशा वर्कर काम पाहतात. मयत सुरेश कोळी यांचा मुलगा इयत्ता आठवी आणि मुलगी पाचवी मध्ये चोपड्यात शिक्षण घेत आहेत.
सुसाईड नोटमध्ये केला उल्लेख
मृत्युपूर्व सुरेश कोळी यांनी लिहले आहे की, मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी टोकरे कोळी सर्टिफिकेट व व्हॅलीडीटी मिळत नाही, त्याचे भवितव्य खराब होत आहे, त्यांच्या मुळे शिष्यवृत्ती मिळत नाही. माझ्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, सरकारचे शिक्षण कडे दुर्लक्ष करत आहे. शिक्षणाला फार खर्च येतो. त्यामुळे आई वडील परेशान होतात व आत्महत्या कराव्या लागतात, जेणे करून शिक्षण समितीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा अजून फार पालकांना आत्महत्या कराव्या लागतील असे सुरेश कोळी यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.