जम्मू-काश्मीर :- मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांनी काश्मीरचे प्रचंड शोषण केलं आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधानमोदी सतत विविध राज्यांत प्रचार सभा घेत आहेत. मोदींची आज जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान सभेच्या सुरूवातीला मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली दिली आहे. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी विविध मुद्यावरून काँग्रेसला व पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सवर आणि अनुल्लेखाने फुटीरतावाद्यांवर निशाणा साधला. अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबीयांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना मी देशाचे तुकडे करू देणार नाही. मी एका भिंतीसारखा त्यांच्यासमोर उभा राहीन अशा शब्दात मोदींनी निशाणा साधला.
मोदींनी जम्मू-काश्मीरमधील काश्मीर पंडितांच्या पलायनचाही मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधु-भगिणींना आपले घर सोडावे लागल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसला त्यांच्या मतांबाबत इतकी काळजी होती की, काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीकाही काँग्रेसवर करण्यात आली.
तर २०१४ मध्ये मला मतदान केल्यामुळेच काश्मीरमध्ये सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना आरक्षण मिळतं आहे असंही त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकचं कौतुकही त्यांनी केलं. ‘सर्जिकल स्ट्राइक , एअर स्ट्राइकचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. पण या हल्ल्यांमुळे विरोधकांच्या पोटात इतकं का दुखतंय? त्यांना नक्की कोणाचं समर्थन मिळतं आहे?’ असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी संरक्षणविषयक करार काँग्रेससाठी फक्त पैसा कमवण्याचा मार्ग आहेत अशी टीकाही त्यांनी केली. ‘काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काही घेण-देणं नव्हतं. भारतीय सैन्य त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होता. सुरक्षा करारांमधून फक्त पैसे लाटण्याचे काम त्यांनी केलं’ अशी टीका मोदींनी केली आहे.