अमळनेर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होत नसतानाही नागरिक ऐकायला तयार नाहीत. पोलिसांनी आणि पालिकेने तीन लग्नकार्याच्या यजमानांना दंड करून मुद्रांक विक्रेते कार्यालय ३० एप्रिलपर्यंत सील केले आहे.
२२ रोजी सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, प्रमोद पाटील, बी.एन. साळुंखे, पालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, विशाल सपकाळे, अविनाश बिऱ्हाडे, जगदीश बिऱ्हाडे यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लग्नाच्या ठिकाणी पाहणी केली असता तीन ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमली असल्याचे आढळून आले.
तसेच जेवणाच्या पंगती सुरू होत्या, त्यामुळे कल्पनाबाई साखरलाल महाजन, शैलेश निंबा अमृतकार, भिकन नामदेव पाटील या तीन वेगवेगळ्या आयोजक व यजमानांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
दररोज कारवाई करूनही कमी प्रमाणात दंड होत असल्याने नागरिक, दुकानदार नियमांचा भंग करीत असल्याने गर्दी वाढून संसर्गाने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वर्तणुकीत सुधारणा करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.