मुख्यमंत्र्यानी जनतेचे हित पाहून आरेतून मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोधकांकडून विरोध केला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहूनच आरेतून मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

मंत्री पाटील जळगावात असताना अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. आरे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा यावेळी मंत्री पाटील यांनी समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, तसे आमचेही म्हणणे होते की बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे. मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. पण बुलेट ट्रेन अहमदाबाद का झाली, असा आमचा विषय होता. आता मुंबईतील कारशेडच्या बाबतीत ते काही म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर लोकांसाठी काही गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजेत. पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक जे वातावरण आहे, ते टिकवणे महत्त्वाचे आहे. आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी अशी कोणतीही जागा उपलब्ध नाही. आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.