इंदोर, भोपाळ, गोवा, दिल्लीत एकाचवेळी छापे
नवी दिल्ली / भोपाळ : प्राप्तिकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्ती दिल्ली, गोवा आणि मध्यप्रदेशातील ५२ ठिकाणांवर धाडी टाकल्याने खळबळ उडाली. प्राप्तिकर विभागाच्या जवळपास २०० अधिकाऱ्यांच्या पथकाने कमलनाथ यांचे माजी विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) प्रवीण कक्कड, माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी आणि त्यांच्या मेहुण्याशी संबंधित कंपनी मोजर बेयरचे ज्येष्ठ अधिकारी आणि त्यांचे भाचे रातुल पुरी यांच्या कंपनीवर या धाडी टाकल्या. या धाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्तिकर विभाग आणि पोलीस यांच्या किमान २०० अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे तीनपासून छापे घालण्यास सुरुवात केली. निवडणूक काळात हवालामार्गे आणि करचुकवेगिरीतून पैसे उभे करण्यात असल्याच्या संशयातून हे छापे घालण्यात आले. इंदूर, भोपाळ, दिल्ली (ग्रीन पार्क) येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या धाडींमध्ये १० ते १४ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली आणि अन्य राज्यांत मतदारांना लाच देण्यासाठी या रकमेचा उपयोग केला जाणार होता, अशी शक्यता आहे. तथापि, या धाडींची प्राथमिक माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड, आयटी विभागाची संबंधित शाखा आणि निवडणूक आयोग यांना देण्यात आली आहे.