जळगाव | प्रतिनिधी
जैन हिल्स् येथील कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या एका कृतीतून त्यांची विनम्रता आणि शरद पवारांचे महत्व अधोरेखीत झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व्दिगूणीत झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर सुत्रसंचालक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे करतील असे जाहीर केले. अशोकभाऊ स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विनम्रपणे आधी शरद पवार यांचे स्वागत करा असे सुचविले. यामुळे सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून शरद पवारांच्या स्वागताची घोषणा करण्यात आली. कववर्य ना.धो.महानोर हे शरद पवार यांच्यास्वागतासाठी आले. तो पर्यंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योगपती अशोकभाऊ जैन थांबून होते. यानंतर एकाच वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत अशोकभाऊ तर शरद पवार यांचे स्वागत ना.धो.महानोर यांनी केले.
उध्दव ठाकरे यांच्या या एका कृतीतून अनेक संकेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना मिळाले. शरद पवार यांचे राज्यातील महत्वाचे स्थान यामुळे अधोरेखीत झाले असून उपस्थितांमध्ये या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे कौतुक होत होते.
