भुसावळ | प्रतिनिधी
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम चारही भावंडांनी केले आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांचे जीवन कार्य व साहित्य सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. त्यातल्या त्यात अध्यात्मिक तत्वज्ञान समजून घेण्यासाठी मुक्ताई गाथा मोलाची भूमिका पार पाडणार असल्याचे प्रतिपादन डिगंबर महाराज पतसंस्था पंढरपूरचे अध्यक्ष तथा मसाका संचालक नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी केले.
मेहूण येथील अॅड. गोपाल दशरथ चौधरी लिखित मुक्ताई गाथा भुसावळ येथील डॉ. जगदीश पाटील यांनी श्री. नारखेडे यांना भेट दिली, त्यावेळी त्यांनी मुक्ताई गाथा विषयी आपले मत व्यक्त केले. मुक्ताईंचे 257 अभंग संकलित करून त्याचा अर्थ सहज, सोप्या व सुलभ भाषेत अॅड. चौधरी यांनी केला आहे. तसेच संत साहित्यावर पीएच. डी. केलेल्या डॉ. जगदीश पाटील यांनी श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या चरित्राचे लेखन या गाथ्यात केले असल्याने हा गाथा सर्वसामान्य भाविकांसह विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करणारा ठरेल असेही श्री. नारखेडे यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश नेहेते, पर्यवेक्षक युवराज झोपे, ग. स. सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.