तर उद्योगपती गौतम अदानी दुसऱ्या स्थानी नवी दिल्ली : फोर्ब्सने भारतातल्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत तर उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानी आहेत. मागील 12 वर्षापासून मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमाकांवर राहण्याचा मान पटकावत आहेत. 2019 या वर्षांत भारतातील या धनिकांच्या एकूण संपत्तीत जवळपास 8% पर्यंतची घट झाल्याचे समोर आले आहे. श्रीमंताच्या यादीत गेल्यावर्षी जे सहभागी होते त्यापैकी 9 श्रीमंतांची क्रमवारी घसरली आहे. या यादीतील जवळपास 14 धनिकांची संपत्ती 9 बिलियन डॉलरने कमी झाली असल्याचे फोर्ब्सकडून सांगण्यात आले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गेल्या 12 वर्षांपासून मुकेश अंबानी हे आपले स्थान टिकवून आहेत. श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या मुकेश अंबानी यांची संपत्ती 51.4 बिलियन डॉलर इतकी आहे. अशोक लेलॅंडचे मालक असलेले हिंदुजा ब्रदर्स हे तिसऱ्या स्थानी, शाहपूरजी पलोनजी ग्रुपचे पलोनजी मिस्त्री हे चौथ्या स्थानी, कोटक महिंद्रा बॅंकेचे उदय कोटक हे पाचव्या स्थानी आहेत. एचसीएल समुहाचे अध्यक्ष शिव नडार हे सहाव्या स्थानी आहेत. यंदाच्या फोर्ब्सच्या धनिकांच्या यादीत सहा नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे.