मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

0

मुंबई :- रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असून पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरल्याने मुंबईत अनेकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर रेल्वे मार्ग अशा तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून या भागांतही अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे.

रविवारी दुपारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून दमदार बॅटिंग सुरू केली आहे. दक्षिण मुंबईसह, मध्य मुंबई आणि मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये तुलनेने जोरदार पाऊस कोसळत आहे. माटुंगा दादर वरळी लालबाग परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे वेगवान शहर अशी ओळख असलेल्या मुंबईचा वेग काहीसा मंदावला आहे.


मुंबई-ठाण्यासह, पालघर, कोकण आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले. परिणामी बलसाड फास्ट, फ्लाइंग राणी या गाड्या रखडल्या आहेत. अवध एक्स्प्रेसही पालघर स्थानाकात रखडली आहे. शिवाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालघर-सफाळे, बोईसर-पालघर हे रस्ते बंद झाले आहत. या बरोबरच सफाळे बाजारपेठेतही पाणी साचल्याचे वृत्त आहे. चारोटी-डहाणू रोडवरील गुलजारी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. पालघरमधील सूर्या आणि कंक्राटी नदीलाही पूर आला आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. डहाणूतही पावसाचा जोर वाढला आहे.

या बरोबरच, कर्जतजवळील ठाकूरवाडी स्थानकाजवळ मालगाडीचे काही डबे घसरल्याने मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.