मुंबई: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवांवर परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील लोकल्स १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने उसंत घेतलेली नाही. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. तर अंबरनाथ येथे रिक्षा स्टँडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या पावसामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि त्याचदिवशी मुंबईहून पुन्हा पुण्याला येणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि पनवेल पॅसेंजर या गाड्या २९ आणि ३० जूनला रद्द करण्यात आल्या आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ ही एक्स्प्रेस दौंड आणि मनमाडमार्गे सोडण्यात येणार आहे अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान मुंबईतली लोकल वाहतूही उशिराने सुरू आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुसळधार पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मुंबई, रायगड आणि पालघर, पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
#Maharashtra: Rain showers continue to lash #Mumbai pic.twitter.com/ykaLtgX4ho
— ANI (@ANI) 29 June 2019
राज्यात मान्सूनला चांगली सुरुवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरताच राज्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. मुंबईत रात्रभर अधूनमधून मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता.

