मुंबईत एल्गार मोर्चा : आझाद मैदानात आंदोलकांची मोठी गर्दी

0

मुंबई– कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली आहे मात्र, मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली आहे. दरम्यान, पोलिस आणि आंदोलक यांच्यात आझाद मैदानात बाचाबाची झाली. प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात पोहचले असून, हजारोंची संख्येने आंदोलक मोर्चासाठी पोहचले आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की, सरकार संभाजी भिडेंना वाचवतयं तसेच त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांना अटक करत नाहीये. संभाजी भिडे दोषी आहेत की नाही हे ठरविणारे सरकार कोण? असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, भिडे दोषी आहेत की नाहीत हे पोलिसाचा अहवाल आणि कोर्ट ठरवेल, सरकार नावाच्या यत्रंणेने यात हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही. यापुढे सरकार व नरेंद्र मोदींविरोधातील लढाई आणखी तीव्र करू, असे आंबेडकर म्हणाले.

भीमा कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (सांगली) यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी राज्यभरातून हजारो भीमसैनिक एल्गार मार्चसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. भायखळा येथून निघणाऱ्या मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तर आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे भारिप अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याने मुंबापुरीची चाके काही काळ थांबवण्याची शक्यता आहे.

भायखळा ते आझाद मैदान मार्गावर एल्गार मार्च निघणार होता. मात्र, पोलिसांनी आझाद मैदानात फकत आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. त्यावर मार्चचे नेते अॅड. आंबेडकर यांनी ‘सरकार आमच्या मूलभूत हक्काची गळचेपी करतंय’ अशी टीका केली. इतका मोठा समुदाय शिवाजी टर्मिनसला उतरल्यास त्याचे नियोजन कसे करणार? मार्चचे अचानक नियोजन बदलल्यामुळे गोंधळ झाल्यास ती सरकारची जबाबदारी राहील, अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान यांनी एल्गार मार्च आयोजित केला आहे. दोन आठवड्यापासून मार्चचे नियोजन चालू आहे. राज्यभरातून भीमानुयायी मार्चला येणार आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, लिंगायत सेवा संघ, ओबीसी परिषद, मागासवर्गीय कर्मचारी संघटना आदींनी मार्चला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सहभागींची संख्या २५ ते ३० हजारांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे मुंबईत अधिवेशन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मार्च निघत आहे. मागच्या आठवड्यात मुंबईत किसान सभेने लाँग मार्च आणला होता. त्या वेळी त्याच्या सर्व मागण्या मान्य करणे सरकारला भाग पडले होते. त्यातून सुटका होत नाही तोवर एल्गार मार्चचे संकट उभे राहिल्याने सरकारची कोंडी झाली आहे.

अघटित घडल्यास सरकारची जबाबदारी-

भारिप अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली. ‘मार्च निघू नये असा पोलिसांच्या आडून सरकार प्रयत्न करत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. तरीसुद्धा मार्चला परवानगी दिली नाही. मार्च पक्षाचा नसून समाजाचा आहे. शिवाजी टर्मिनसला काही गडबड झाल्यास ती सरकारची जबाबदारी राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.