मुंबई : राज्यातील करोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. दरम्यान, करोनामुळे मुंबईत २५ वर्षांच्या युवकासह १२ जणांचा शनिवारी मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. तर करोनाची लागण झालेल्या १८९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे. करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेल्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ताज महल पॅलेज हॉलेटमध्येही करोनाचा संसर्ग झाल आहे. येथील सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये भितीचे वातावरण आहे. या सहा कर्मचाऱ्यांवर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ताज हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ताज हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, ताज हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळत असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व ज्यांच्यात करोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.