मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. एलपीजी गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होत आहेत.
कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आर्थर रोडजवळ आहे. इथे एलपीजी गॅस पाईपलाईन लीक झाली. त्यामुळे तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढलं जात आहे. ही गॅसगळती तुलनेने मोठी नाही. सकाळी 11.30 च्या सुमारास गॅस गळती झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कस्तुरबा रुग्णालय परिसरात सकाळी 11.30 च्या सुमारास एलपीजी गॅस लीकेज झाल्याचं लक्षात आलं. या परिसरात गॅसचा वास येत होता. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने त्याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न लावता, कस्तुरबा रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यादरम्यान, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना बाहेर हलवण्यास सुरुवात केली. दरम्यान, अग्निशमन दालच्या चार गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने इथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.