मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा हा नियंत्रणात येताना दिसत आहे.
राज्यात (3 जानेवारी) 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईत आज फक्त 581 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
मार्च-एप्रिल या कोरोनाच्या महिन्यानंतर मुंबईत प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. झोपडपट्टयांतील कंटेन्मेंट झोनची आणि सीलबंद इमारतीची संख्येतही घट होत आहे. कोरोनासंदर्भातील शनिवार (2 जानेवारी) आणि आज (3 जानेवारी) अशा दोन दिवसांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्या 283 वरून 221 एवढी झाली आहे.
याचा अर्थ झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येत 62 ने घट झाली आहे. तर सीलबंद इमारतीची संख्या 2,462 वरून 2090 एवढी झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये 373 ने घट झाली आहे.
तसेच, कोरोनामुळे शनिवार (2 जानेवारी) 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर आजच्या अहवालात केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत 4 ने घट झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 132 वरून 11,135 एवढी झाली आहे.
त्याशिवाय काल कोरोनाच्या चाचण्यांची संख्या 23 लाख 82 हजार 420 एवढी होती. तर दिवसभरातील 11,170 चाचण्यांची भर पडली आहे. आता एकूण चाचण्यांची संख्या 24 लाख 93 हजार 590 एवढी झाली आहे.