लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव; मुंदखेडा येथे एका शेतकऱ्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील रामदास धना पाटील (वय-८२) या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली. त्यातून ३ लाख ९ हजार सातशे रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. दरम्यान १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रामदास धना पाटील हे परिवारासह तांदुळवाडी ता. भडगाव येथे गेले.
ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा पाठीमागील दरवाजा अर्धा उघडा दिसून आला. त्यावर रामदास पाटील यांनी घरातील गोजरेज कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड ३ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले.
या घटनेने रामदास पाटील यांच्यावर डोंगरच कोसळले आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून घामातून कमविलेले उत्पन्न एका क्षणात अज्ञाताने डल्ला मारला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.