मुंबई: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी भाष्य केलं आहे. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मी योग्य वेळी बोलेन. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असं म्हणत अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सर्व सहकारी सोबत आहेत. त्यामुळे गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून तसूभरही तथ्य नसलेल्या बातम्या दिल्या जात आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी प्रसारमाध्यमांबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केलं. पवार साहेब माझे नेते आहेत आणि पुढेही राहतील. मी आधीदेखील ही गोष्ट शब्द केली आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.
नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यासाठी सर्वा अजित पवार विधानभवनात दाखल झाले आहेत. तसेच मला सध्या काही बोलायचे नाही, मी योग्य वेळ आल्यावर बोलणार, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर त्यांनी दिलं.
अजित पवार यांनी मंगळवारी रात्री सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यासंबंधी विचारण्यात आलं असता, शरद पवार आपले नेते आहेत म्हणूनच भेटायला गेला होतो असं त्यांनी सांगितलं.