चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या चार वर्षापासून चाळीसगावातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय व शेवटच्या घटका मोजणारी अशी झाली आहे. माझ्या अंगावर धुळे रोड कॉलेज चौफुलीपासून तर कृषी उत्पन्न बाजार समिती घाटरोड पर्यंत जवळपास तीनशे ते चारशे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा मला किती त्रास होतो आहे. हे तुम्हाला मी शब्दात कसं सांगू. गेली तीन-चार वर्ष या खड्ड्यांमध्ये या रस्त्यावर थोडीफार नगरपालिका डागडुजी करेल असं वाटत होतं. पण माझ्या भावना कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. नगरपालिका प्रशासन पूर्णतः कुंभकर्णाच्या झोपेत आहे असं मला वाटतं.
काल परवा माननीय खासदार साहेबांनी यासंदर्भात नगरपालिका प्रशासन व सन्माननीय मुख्याधिकारी नगरसेवक यांची समन्वय बैठक घेतली होती. येणाऱ्या पंधरा दिवसात दीड कोटी खर्चून रस्ते दुरुस्ती करण्याचा विषयी त्यांनी घेतला होता. येणाऱ्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या, असे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिलेत व गाठ माझ्याशी आहे असे सांगितले. पण काय नगरपालिका ऐकेल ते नगरपालिका कसली.. तब्बल एक महिना झाला तरी माझे काही भाग्य उजळले नाही.
माझ्या अंगाखांद्यावरून जाणाऱ्या असंख्य माझ्या बंधू – भगिनी यांच्या शरीराची या रस्त्यावरून चालताना हाडे खिळखिळी होत आहेत. याचेही मला अतोनात दुःख होते. पण करणार काय हे दुःख सांगायचे तरी कोणाकडे ? चाळीसगावातील कॉलनीतील संपूर्ण शहरातील एक चांगला रस्ता दाखवा व माझ्याकडून एक लाख रुपये मिळवा. अशी योजना जरी मी काढली ना तरीही ही योजना कोणी जिंकू शकत नाही. कारण चाळीसगावातील एकही रस्ता खड्डेमुक्त नाही किंवा चांगला नाही. नगरपालिका तीन वर्षापासून सांगत आहे. स्वच्छ जल योजनेचे काम चालू आहे, भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे, पण ते काम कधी पूर्ण होईल त्याचे नियोजन काय याचे उत्तर कोणाकडे नाही.
पण मनी आशा करू शकतो का? येणाऱ्या काही दिवसात त्या रस्त्यांचे भाग्य उजळेल व निदान या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये डांबर युक्त खडी टाकून त्याला बुजविण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी मला मनस्वी बरे वाटेल व चाळीसगावकरांचे काहीतरी काम झाले. असे मला वाटेल व मी नगरपालिकेला सतत यासंदर्भात धन्यवाद देईल. माझे हे आत्मवृत्त रस्त्याचे आत्मवृत्त अतिशय वेदनादायक व तितकेच मनाला चटका देणारे आहे. पण नगरपालिकेला सन्माननीय नगरसेवकांना यातून जाग येईल व माझ्या आत्मवृत्ताची कोणीतरी दखल घेईल, याची मी आशा व्यक्त करतो.. धन्यवाद..