मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष अन् ते म्हणतात विरोधात पैलवान नाही – शरद पवार

0

चाळीसगाव – आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असे प्रतित्युत्तर पवार यांनी दिले. चाळीसगाव येथे राष्ट्रवादी आघाडीचे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी वाल्मिकी समाजाला काही सवलतीच्याबाबतीत आश्वासन दिलं. मात्र शहा दिलेला शब्द किती पाळतात हे मला चांगलं माहीत आहे म्हणून मी त्याची चौकशी केली तर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आजच्या सत्ताधारी लोकांची भूमिका सांगायचं एक आणि त्याची पूर्तता करायची नाही अशीच आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला.

दरम्यान, मागची पाच वर्ष हातात सत्ता तुमची आणि हे इथे येऊन आम्हाला बोलतात तुम्ही काय केलं. तुम्ही जबाब द्यायला हवा पाच वर्ष सत्ता तुमच्या हाती होती. आता याचं उत्तर जनता २१ तारखेला देवून तुम्हाला धडा शिकवला शिवाय शांत बसणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. राज्यातील प्रश्न काय आणि पंतप्रधान येऊन ३७० कलमाबद्दल पवारांनी उत्तर देण्याची मागणी करतात. अरे लोकांच्या पुढे ३७० हा प्रश्न नाहीये तर शेतीच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली? कर्जबाजारीपणा का वाढलाय? हे प्रश्न सोडविण्याचे सोडून ३७० चा मुद्दा पुढे करतात असे सांगतानाच आज शेगावला एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली याची आठवण सरकारला करुन दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.