पाच दहशतवादी यमसदनी ; बुरहान वानीची गँग संपुष्टात
नवी दिल्ली ;– दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ‘मिशन ऑल आउट’ला आज मोठं यश मिळालं. या चकमकीत हिजबुलचा मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातल्याने दहशतवादी बुरहान वानीची गँग संपुष्टात आली असल्याचं बोललं जात आहे. चकमकीत सद्दाम पाडरसह डॉक्टर मुहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. परिसरात शोधमोहिम अजूनही सुरू असल्याची माहिती आहे.महाराष्ट्राचे मेजर जयेश वर्मा यांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’चे नेतृत्व केले.
आज सकाळपासूनच शोपियांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. दोन्ही बाजुंनी प्रचंड गोळीबार सुरू असल्यानं संपूर्ण काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण होतं. सुरक्षा दलानं अत्यंत नेटानं किल्ला लढवत एक-एक करत दुपार होण्याच्या आत ५ दहशतावाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे.
आज झालेल्या चकमकीत सद्दाम पाडरसह डॉक्टर मुहम्मद रफी बट, बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी बट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. चकमक सुरू झाली तेव्हा बटने शरणागती पत्कारावी म्हणून त्याच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. मात्र त्याने कुणाचेच ऐकले नाही. त्याच्यासह इतर दहशतवाद्यांनाही जवानांनी शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनीही ऐकले नाही. त्यामुळे जवानांनी या पाचही जणांना टिपले. ‘ऑपरेशन ऑल आउट’द्वारे लष्करानं यावर्षी एकूण ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.