खामगाव (प्रतिनिधी): स्थानिक सांज दैनिक एकच घाव चे संपादक तथा खामगाव प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय स्तरावर मीडिया, इंटरनेट अँड टेलीफोनी कंझुमर्स असोसिएशनची आज 21 मार्च रोजी स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सदर असो. च्या स्थापनेसाठी मागील दोन महिन्यापासून राष्ट्रीय स्तरावर विविध तज्ञांसोबत ऑनलाइन चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मनोरंजन, माहिती, संपर्क, वृत्त तसेच इंटरनेट व तत्संबंधी साधने, दूरसंचार यंत्रणा हे सर्व आजच्या डिजिटल युगात महत्वाचे झाले असून प्रत्येक कुटुंबाचे डिजिटल समावेशन हे कौटुंबिक, व्यक्तीगत, तसेच राष्ट्र विकासा साठी आवश्यक झाले आहे. त्यामुळे डिजिटल समावेशनासाठी माध्यमे, साधने आणि यंत्रणा यांच्यात सुयोग्य संवाद असणे आणि वापरकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणारी व्यवस्था असणे हे गरजेचे झाले असल्याचे मत चर्चे दरम्यान तज्ञांनी व्यक्त केले. त्यानुसार सरकार, सेवा पुरवठादार कंपन्या आणि उपभोक्ता यांच्यातील दुवा म्हणून सुलभतेचे काम करणारी संस्था तसेच उपभोक्ता ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सेवा पुरवठादार कंपन्यांचे अधिकार्यांसोबत समन्वय साधणारी संस्था म्हणून मीडिया, इंटरनेट अँड टेलीफोनी कंझुमर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाइन झालेल्या चर्चेनुसार किशोरआप्पा भोसले यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर संस्थेची गावपातळी पासून देशभर शाखा सुरू करण्यासोबतच पदाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारीही नवनियुक्त अध्यक्षांकडे देण्यात आली आहे.
सदर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल चाहत्यांनी किशोरआप्पा भोसले यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन पुषगुच्छ देवून सत्कार केला. या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, पत्रकार मुबारक खान, सांजदैनिक खामगाव फास्टचे संपादक महेश देशमुख, पत्रकार संभाजीराव टाले, पत्रकार गणेश भेरडे, पत्रकार पंकज गमे, पत्रकार सय्यद अकबर, पत्रकार चंद्रकांत मुंडीवाले, सायबर फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकान्त वावगे सह मान्यवर उपस्थित होते.