परिसरात लवकरच कारवाई; पोलीस बंदोबस्ताची मागणी
जळगाव –
शहरातील मास्टर कॉलनी, मस्जिद उमर चौकाची मंगळवारी सकाळी 8.30 वा. आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी पहाणी केली. यावेळी पहाणी करुन आवश्यक सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.
मस्जिदे उमर, मास्टर कॉलनी रोडवरील अतिक्रमणाबाबत परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण वाढल्याचे तक्रार करत अतिक्रमण काढण्याची मागणी दि. 1 रोेजी पत्रकाद्वारे केली. होती. दिलेल्या पत्रकात अक्सा नगर, मास्टर कॉलनी, मस्जिद उमर या परिसरातील नागोरी चौक ते शाह यांच्या चक्की पर्यंतचा 12 मीटर रुंदीच्या रोडवर बेकायदेशीर अतिक्रमित दुकाने मटन विक्री सुरु आहे. सदर रोडवर मुख्यत: कुरैशी समाजाच्या मटन विक्रीच्या दुकानांनी अतिक्रमण केलेले असल्याचे तसेच मटन विक्रीमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
परिसरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. परिसरातील अबालवृद्धांना कुत्र्यांपासून उपद्रव व हैदोस वाढला आहे. कुत्र्यांमुळे संसर्गजन्य रोग वाढण्याचीही भिती व्यक्त होत आहे.
पोलीस बंदोबस्त मागितला
मास्टर कॉलनी, मस्जिद उमर मेहरुण चौकातील रस्त्यावर मनपाची अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावरील वाढीव पक्की अतिक्रमण पाडण्यात येणार आहे. कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मनपा प्रशासनातर्फे दि. 8 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्ताची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे मनपा उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी केलेली आहे.