जेरुसलेम: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे करोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी संशोधकांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फेसशिल्डचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, एका कंपनीने मास्कमुळे करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा होत असल्याचा दावा केला आहे. इस्रायलमधील Sonovia या कंपनीने हा खास मास्क बनवला आहे.
इस्त्रायलच्या या कंपनीने खास झिंक ऑक्साइड नॅनो पार्टिकलचं कोटिंग या मास्कवर केले आहे. त्यामुळे ९९ बॅक्टेरिया आणि व्हायरस निष्क्रिय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शांघायमधील मायक्रोस्पेक्ट्रम लॅबमध्ये या मास्क चाचणी घेण्यात आली आहे. त्या चाचणीतही व्हायरस ९० टक्क्याहून अधिक प्रमाणात निष्क्रिय होत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चीनमधील संशोधकांनी शनिवारी लशीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू केली. सहा संभाव्य लशींची चाचणी चिनी संशोधक मानवावर घेत आहेत. यापूर्वी मेपासून पहिल्या टप्प्यात २०० जणांवर चाचणी घेण्यात आली आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये लशीचा डोस निश्चित केला जाईल, तसेच संभाव्य लस निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुरक्षितपणे प्रतिकारशक्ती वाढवते का, हे पाहिले जाणार आहे.