पुणे : सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पण, बदलत्या परिस्थितीमुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी त्याला थोडा विलंब होणार आहे.
सध्या मान्सूनने दक्षिण अंदमान समूह, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटे व्यापली आहेत. बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग उत्तर अंदमान बेटांवर मान्सून पोहोचवण्यासह अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या भागात दि.21-22 मेच्या आसपास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गतवर्षी दि.25 मे रोजी अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनने सर्वसाधारण वेळेपेक्षा दोन दिवस आधीच दि.29 मे रोजी केरळात आगमन झाले होते. त्यानंतर दि.8 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. यावर्षी दि.6 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात असणारी उष्णतेची लाट अद्यापही कायम असून अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 42 अंशांच्या पुढे गेलेला आहे.