पुणे :- नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) सोमवारी मालदीव, कोमोरीनसह दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. मान्सूनच्या पुढील प्रगतीस हवामान अनुकूल असून, सहा जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.
गुरुवारी (दि. 30 मे) मान्सूनने संपूर्ण अंदमान बेटांचा परिसर व्यापला तर अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव बेट आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मान्सून दाखल झाला होता. बुधवारी (दि.5) दक्षिण भारतात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर मॉन्सूनच्या केरळातील आगमनासाठी पोषक हवामान होईल. यंदा मान्सून सहा जून रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे.
दरम्यान, मध्य भारतात उष्णतेचा कहर कायम असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीने दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.