जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोहरीतांडा येथे एका घराच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर अज्ञात महीलेने पुरूष जातीचे जिवंत अर्भक टाकुन पोबारा केल्याची घटना आज दि.७ रोजी सकाळी ५ ते ६च्या दरम्यान उघडकीस आली. विशेष म्हणजे या अर्भकाचे सर्व अवयव सुस्थितीत काम करीत असुन, त्याला कुठलेही व्यंग नाही .तरीही गोऱ्या-गोमट्या एका दिवसाच्या बाळाला चक्क फेकुन दिल्यामुळे परीसरात वेग-वेगळ्या चर्चेला चांगलेच उधान आले आहे. अनैतीक संबंधातुन कींवा सदर महीला कथितपणे मनोरूग्ण तर नसावी ना असे विवीधांगी स्वरूपाच्या चर्चेनंतर फेकुन वा टाकुन देण्यात आलेल्या बाळाचा बाप कोण ? येथवर आता हि चर्चा सुरू झाली आहे. पोलीसांच्या तपासानंतर खरे काय ते समोर येईलच मात्र जनतेमध्ये या संतापजनक कृत्याचा संताप व्यक्त होत आहे.
घटनेबाबत पोलीस पाटील रमाकांत विकास पाटील यांनी पोलीस ठाण्यात खबर देऊन त्या बाळाला पोलीसांच्या हवाली केले.लागलीच पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांनी कर्मचारी सोबत घेऊन शहरातील संजिवनी या लहान मुलांच्या दवाखान्यात दाखल केले आहे.डॉ अमोल सेठ यांच्यानुसार बाळाची प्रकृती स्थिर असून बाळाला ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे .या घटनेबाबत अज्ञात महीले विरुद्ध कलम ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे. कॉस्टेबल विलास चव्हाण करीत आहे.
या संतापजनक घटनेनंतर मात्र डोहरीतांडा येथे सापडलेल्या एका दिवसाच्या बाळाचे संगोपण करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे अनेकांनी तयारी दर्शविल्याने एक दिलासादायक चित्रही समोर आले आहे.