माता झाली वैरिणी.. प्रियकराच्या मदतीने साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

0

शिराळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  

शिराळा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

मनन सुशांत वाजे (वय- साडेतीन वर्षे, रा. माळभाग, वाळवा जि. सांगली) असे मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (रा. बिळाशी, ता. शिराळा) या दोघांवर खुनाचा व प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत वाजे यांना त्यांची पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. २७ जून २०२१ रोजी प्राची ही मुलगा मनन सोबत घरात कोणाला काहीही न सांगता अचानक निघून गेली होती. ती मुंबईला अमरसिंह पाटील याच्या घरी वास्तव्यास गेल्याची माहिती सुशांत यांना मिळाली.अनैतिक संबंधास अडचण ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या मृतदेहाची वाकुर्डे ता.शिराळा येथे अंत्यसंस्कार करुन विल्हेवाट लावली होती.

मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना अमरसिंह पाटील आणि प्राची यांनी बिळाशी ता.शिराळा येथील ग्रामसेवकांकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर प्राची आणि अमरसिंह हे दोघे पुन्हा मुंबईला गेले होते. याबाबत सुशांत वाजे यांना एक निनावी पत्र मिळाल्यानंतर मननच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे.

आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी अमरसिंह आणि प्राची या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी एक पथक तैनात करण्यात आलं आहे. या घटनेने शिराळा आणि वाळवा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.