माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोऱ्यात आढावा

0

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेस सुरुवात झाली असून आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोरा प्रांत कार्यालयास भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. तसेच श्री. राऊत यांनी ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी तहसीलदार कैलास चावडे, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती बाविस्कर, डॉ. समाधान वाघ, भूषण मगर, सुनील गवळी, श्री. भोसले, कर अधीक्षक दगडू मराठे यांचेसह विविध विभागांचे प्रमख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी पाचोरा येथील कोरोना (कोविड-१९) संदर्भातील परिस्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर पाचोरा शहरातील गणेश कॉलनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या परिसरातील नागरिकांची आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीची पाहणी केली व नागरिकांशी कोरोना विषयी संवाद साधला.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत ५० वर्ष वयावरील व्यक्तींच्या शरीरातील तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार असून नागरीकांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर इतर आजारांची माहिती घेतली जाणार आहेत. या मोहिमेत ज्येष्ठ नागरीक, वयस्क, यांना असलेले आजार, हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असून त्यांना काही कोरोना सदृश्य लक्षणे आहेत का याचीही पाहणी या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी तालुकापातळीवर या मोहिमेच्या पाहणीसाठी मोहिमेच्या सुरुवातीसच भेट दिल्याने यंत्रणाही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पाचोरा उपविभागात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून कोविड-१९ ला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही या मोहिमेतंर्गत नागरीकांची आरोग्य तपासणी करुन संशयित रुग्ण शोधून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
00000

Leave A Reply

Your email address will not be published.