नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची (Covid -19) लागण झाली होती. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांकडून अथक प्रयत्न, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे”.