जळगाव – चार वर्षीय बालक आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरुन जात असतांना अचानक आडव्या गेलेल्या मांजाच्या दोर्याने त्याचा गळा चिरला गेला आणि रक्तस्त्रावर सुरु झाला. तातडीने त्या बालकाला उपचारसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले असून त्या बालकाच्या गळ्यावर शस्त्रक्र्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच बालक बोलायला लागला.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची धाव रुग्णालयात असते. असाच एक जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेला पप्पू निकम हा चार वर्षीय बालक आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी अचानक त्याच्या गळ्याला मांजाची दोरी भिडून गेल्याने त्याच्या गळ्यातून भळाभळा रक्तस्त्राव झाला. तातडीने बालकाला घेवून निकमांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालय गाठले. याप्रसंगी डॉ.विक्रांत वझे यांनी बालकाला पाहिले. गळा चिरला गेल्याने बालकाची श्वासनलिका तुटली होती. तातडीने शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. अर्धातासाच्या शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच पप्पू बोलायला लागला. तीन दिवस त्याला औषधोपचार देण्यात आला असून त्यानंतर सुट्टी देण्यात आली. दहा दिवसानंतर टाके काढण्यासाठी रुग्णालयात आल्यावर पप्पू हसत-बागडत असल्याने निकम कुटूंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया डॉ.विक्रांत वझे, डॉ.मिलींद जोशी यांनी केली असून डॉ.हर्षल, डॉ.श्रृती, डॉ.श्रीयश, डॉ.अग्रवाल, डॉ.बेंडाळे, भुलतज्ञ डॉ.शिवाजी, डॉ.सागर व्यास यांनी शस्त्रक्रियेसाठी परिश्रम घेतले.
अनर्थ टळला – डॉ.वझे
बालकाला घेवून जेव्हा नातेवाईक दवाखान्यात आले त्यावेळी त्याला रक्तस्त्राव खुप होत होता. तातडीने आम्ही त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली. शस्त्रक्रियेला सुरुवात केली, त्यावेळी श्वासनलिका जोडत असतांना आजूबाजूला मेंदूला रक्तपुरवठा करत असलेल्या नसा दिसत होत्या. मांजाचा घाव आणखी खोल गेला असता तर नसांना दुखापत झाली असती, परिणामी मेंदूला होणारा रक्तपुरवठाही खंडीत होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. शस्त्रक्रेयेनंतर काही वेळातच बालक बोलू लागल्याने आमच्या टिमवर्कला यश आल्याची प्रतिक्रिया नाक, कान, घसा तज्ञ विक्रांत वझे यांनी दिली.