महिला सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांची माहिती

0

उद्योगिनी परिवाराचे भविष्य घडवू शकतील: प्रा.धिरज पाटील
भुसावळ | प्रतिनिधी
शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येतात परंतु काही कारणास्तव त्यांच्या पर्यंत योजना पोहचू शकत नाहीत म्हणून भुसावळ येथील श्रीनगर भागातील प्रा.धिरज पाटील व प्रा.सीमा पाटील या पाटील दाम्पत्यांनी 8 मार्च- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याच्या शासनाच्या विविध योजना समाजातील सर्व गरीब, गरजू महिलांना माहिती पोहचवण्याचा संकल्प केला आहे.
भुसावळ विभागाचे तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार सतीष निकम यांच्या हस्ते या योजनांच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन व वितरणाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी प्रा.धिरज पाटील, विशाल ठोके, सूरज चौधरी, मृगेन कुलकर्णी, गौरव पवार, अमोल पाटील, सदानंद वराडे उपस्थित होते.
खाली दिलेल्या शासनाच्या महिलांविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली.
बेटी बचाओ, बेटी पढाओ. महिला आणि बालविकास विभागाच्या योजना. मनोधैर्य योजना. ‘माझी कन्या भाग्यश्री’. जिजाऊ वसतिगृह. अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना. सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र. राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे. किशोरी शक्ति योजना. शुभ मंगल सामूहिक विवाह योजना. संजय गांधी निराधार योजना तसेच महिला उद्योजकतांना चालना देण्यासाठी अन्नपूर्णा योजना, श्रीशक्ती पॅकेज, भारतीय महिला बँक, सेंट कल्याणी योजना, मुद्रा योजना, महिला विकास योजनांची माहिती दिली.
महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर व पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज इत्यादी अनेक महापुरुषांनी आपल्या राज्यातूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती. त्याचेच फलस्वरुप म्हणून आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे आपणास दिसते त्यांनी सक्षम व्हावं हाच आमचा मुख्य उद्देश आहे असे प्रा.सीमा धिरज पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
स्त्रिया एकत्रित येऊन व्यवसाय करत असल्यामुळे व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया असल्यामुळे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात उद्योजकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकारचे उद्योग बचतगटांच्या चळवळीतून जन्माला आले आहेत. यामध्ये भुसावळातुन महिला पुढे आल्यास परिवाराचे भविष्य घडवू शकतील व भुसावळाचा चेहरा मोहरा बदलेल असा ठाम विश्वास आहे, असे मत प्रा.धिरज पाटील यांनी मांडले.
जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, भोई नगर, खळवाडी, अष्टविनायक कॉलनी, काशीराम नगर, रेल दुनिया, गणेश कॉलनी अयोध्या नगर, हुडको कॉलनी, भुसावळ हायस्कूल परिसर, आराधना कॉलनी, शिव कॉलनी, शालीन पार्क, मोहित नगर, भिरुड कॉलनी परिसरातील भागात माहिती पत्रक देण्यात आले व जनजागृती करण्यात आली.
प्रा.सीमा पाटील, दर्शना पाटील, योगिता दुसाने, कोमल पाटील, सुवर्णा पाटील, शिल्पा पाटील, उषा पाटील यांनी सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.