जळगाव: कोरोना संकटात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती राकेश पाटील यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्या सुरक्षेसाठी चार हजार मास्क तयार करून त्यांना सुपूर्द करण्यात आले. सभापतींनी अंगणवाडी सेविकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांना मास्क सुपूर्द केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पाडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बचावाच्या दृष्टीने वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आणि तोंडाला रूमाल किंवा मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना आहार देण्याचे काम करणारे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची सुरक्षा म्हणजे बालकांची सुरक्षा आहे. या दृष्टीने महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील यांनी चोपडा तालुक्यातील चार महिला बचत गटांकडून चार हजार मास्क तयार करून घेतले. थ्री लेअर असलेले वॉशेबल मास्क तयार करून घेतले असून, आज महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सभापती ज्योती पाटील, राकेश पाटील आदी उपस्थित होते. यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक विजय पाटील, सतीष दहाड़, किशोर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.