नागपूर : ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,’ असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं’ असं देखील गडकरी म्हणाले. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘माणूस जातीनं मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचं राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,’ असं गडकरीयांनी म्हटलं.