मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने ठाकरे सरकारची चिंताही वाढवली आहे. राज्यात एका दिवसांत ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक पाऊलं उचलण्याचं ठरवलं आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे राज्यात गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.
या कालावधीत राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर हा लॉकडाऊन कालावधी आणखी काही दिवस वाढवण्यावरही सरकारचा भर असेल. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवाव्या लागणार आहेत.
सरकारने आता लॉकडाऊन केले नाही तर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाखांपर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान सरकारकडून कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या नव्या लाटेला थोपविण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणे कठीण आहे अशी स्पष्ट भूमिका टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. जर तसे झाले नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती येईल असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
टास्क फोर्समधील तज्ज्ञांसोबतच्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांपासून तीन आठवड्यांपर्यंतच्या लॉकडाऊनची शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे १४ एप्रिलनंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
४ ते १० एप्रिल या कालावधीत तब्बल ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले आहेत. तर १९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्युदर ०.५ टक्के इतका असून तो वाढत आहे. गेल्या महिन्यात १४ ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करत आहोत तितका दर वाढत आहे
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २५ हजार ६९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.