मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?
प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर, हिगोली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. कोल्हापुरात अनेक भागात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हायस्कूलच्या इमारतीचेही मोठं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अहमदनगर शहरासह ग्रामिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कांद्याच नुकसान होणार आहे.