मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या 12 मे 2021 च्या ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीला RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर केलेला असेल.
18 एप्रिल 2021 आणि 1 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्या प्रत्येकाला ते लागू असणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या नवीन सूचना http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे, तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.