नवी दिल्ली :- मोदी सरकारकडून विविध राज्यांमधील राज्यपाल बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यात सुमित्रा महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत असून त्यांची जागा रिक्त होणार आहे. त्यांच्या जागेवर सुमित्रा महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांनी सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. तसेच लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत सुमित्रा महाजन यांना इंदूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते.