महापालिका निवडणुकीची धामधूम!

0

जळगाव महानगरपालिका निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार्‍या निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आणि त्यात निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचे आरक्षण सोडत दि.4 एप्रिल रोजी काढण्यात आली. यापूर्वी झालेल्या निवडणूकीत दोन उमेदवार म्हणून एक प्रभाग करण्यात आला होता. यंदा त्यात बदल करून चार उमेदवार मिळून एक प्रभाग करण्यात आला आहे. बदललेल्या प्रभागरचनेमुळे प्रभागाची भौगोलिक व्याप्ती वाढली आहे. त्याचा परिणाम विद्यमान नगरसेवकांच्या वार्डातील काही भाग दुसर्‍या वार्डात गेल्याने विद्यमान नगरसेवकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या विठ्ठलपेठेचा काही भाग प्रभाग 2, 4, 17 मध्ये जोडला गेला आहे. तसेच भाजपचे गटनेते सुनिल माळी यांच्या वार्डातील शनिपेठ, बळीरामपेठचा काही भाग प्रभाग 4 आणि 5 ला जोडला गेला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या प्रभागाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे आता नगरसेवक नरेंद्र पाटील आणि नितीन लढ्ढा हे आमने सामने लढतील. विद्यमान महापौर ललित कोल्हे यांच्या वार्डातही बद्दल झाला आहे. आ.राजुमामा भोळे यांच्या पत्नी सौ.सिमा भोळे यांनाही प्रभाग रचनाच्या बदलाचा फटका बसला आहे. खाविआचे नितीन बरडे यांच्या वार्डातही बदल झाला आहे. प्रभाग रचनेत बदल आणि त्याची वाढलेली व्याप्ती त्यामुळे विद्यमान नगरसेवकांची व या प्रभागात निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांची दमछाक होणार आहे. त्याची धास्ती विद्यमान नगरसेवकांसह निवडणूक इच्छीणार्‍या नवख्या उमेदवारांनीही घेतली आहेत.
नव्या प्रारूप प्रभाग रचनेत एकूण रचनेतील बदलामुुळे एका प्रभागात एकूण चार उमेदवार (अ,ब,क,ड) असतील. असे एकूण चार उमेदवार असलेले 18 प्रभाग आणि 19 व्या प्रभागात तीन उमेदवार मिळून जळगाव महापालिकेत आता एकूण 75 नगरसेवकांची संख्या असेल. प्रत्येक प्रभाग हा 22 ते 25 हजार लोकसंख्येचा राहिल. एकूण 75 सदस्यांमध्ये पाच अनुसुचित जातीसाठी(एससी) राखीव, चार अनुसुचित जमातीसाठी(एसटी) राखीव, ओबीसीसाठी 20 जागा राखीव आणि सर्वसाधारण गटासाठी 46 जागा राखीव असे आराक्षण जाहीर झाले आहे. एकूण 75 सदस्यांपैकी प्रत्येक प्रभागात दोन असे एकूण 19 प्रभाग मिळून 38 महिला सदस्य असतील. म्हणजे सभागृहात पुरुष सदस्यापैक्षा एक महिला जादा असेल. त्यातच महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला जाहिर झाले आहे. जर सदस्यामधून महापौर निवडला गेला तर सभागृहात महापौरांसह 38 महिला असतील. आणि महापौरांची थेट निवडणूक जाहिर झाली तर सभागृहात महापौरासह 39 महिला सदस्य असतील, म्हणजे जळगाव महापालिकेत महिला राज राहणार आहे. महापौर पदाची निवडणूक थेट होईल. की सदस्यांमधून त्याचा निर्णय मात्र अद्याप व्हायचा आहे.
येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार असली तरी प्रभाग रचना व आरक्षण जाहिर होताच निवडणूकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार प्रभागात फेरफटका मारून नागरीकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. जाहिर झालेल्या प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता सोमवार दि.9 रोजी दिली जाणार आहे. त्यानंतर त्या प्रभाग रचनेविषयी तक्रारी सुचना स्विकारल्या जाणार नाही. त्यानंतर त्याला अतिम मान्यता मिळेल. नविन प्रभाग रचना जाहिर होताच, त्याविषयी उलट सुलट चर्चांना उधाण आले. भाजपच्या काही नगरसेवकांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. सत्ताधार्‍यांनी आपल्या सोयीनुसार व भाजपच्या उमेदवारांना अडचणीचे होईल अशी प्रभागरचना अधिकार्‍यांना हाताशी धरून केली गेली. पत्रकार परिषद घेवून जरी भाजपच्या काही नगरसेवकांनी आरोप केले असले तरी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले. बहुतेक सर्वांनी नविन प्रभाग रचनेचे स्वागतच केले आहे. तथापि, प्रभाग रचनेच्या व्याप्तीमुळे सदस्यांचा गोंधळ उडाला असल्याचे भाजप,खाविआसह सर्वांनी मान्य केले आहे. एखाद्या नवा निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा त्याविषयी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणे सहाजिक आहे.
आता निवडणूक तीन ते चार महिन्यावर येवून ठेपली आहे. नव्या मोठ्या प्रभागरचनेमुळे आघाड्याकरून निवडणूक लढविणार्‍यांना अवघड जाणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढविली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तथापि, जळगाव महानगरपालिकेत माजी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे यांच्यातर्फे शहर बचाव आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यादृष्टीने कागदपत्राची जमवाजमा अथवा आघाडीची नोंदणी घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु असून त्याला कितपत यश येते. हे लवकरच दिसून येईल. पक्षीय पातळीवर निवडणूकीचा विचार करता, जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत खाविआ- शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी – काँग्रेस असे तीन पॅनल होण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेना युतीबाबत उलटसुलट चर्चा चालू असली तरी अद्याप युतीबाबत ठोस असे काही जाहिर झाले नाही. जर भाजपसेनेची युती झाली तर काँग्रेस-रा.कॉ.विरूध्द भाजप-सेना अशी समोरा समोर लढाई होवू शकते. भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यानिवडणूकीपासून अलिप्त राहणारा असल्याचे जाहिर केल्याने आणि त्यांचे फार मोठे समर्थक असल्याने त्यांचे समर्थक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व मानण्यास तयार नसल्याने पर्याय म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्वात महापालिका निवडणूक लढविली जाईल असे बोलले जात आहे. सोमवारी पालकमंत्री जळगावात आहे. त्यांच्या उपस्थितीत काय निर्णय होतो हे कळेलच. खाविआ आणि सेनेतर्फे निवडणूक लढण्याचे सर्व अधिकार माजी मंत्री सुरेशदादा जैन हे घेणार आहे. फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात मात्र अद्याप सामसुम आहे. ते कसे मैदानात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.