जळगाव :- राज्य शासनाप्रमाणेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन अायाेगाचा लाभ द्यावा, सेवानिवृत्तांसह कार्यरत कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या रकमा तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी जळगाव शहर महापालिका कामगार युनियनतर्फे साेमवारी सतरा मजली इमारतीसमाेर धरणे आंदोलन करण्यात अाले. शासनाने १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन अायाेग लागू केला आहे . वेतनाच्या थकबाकी भरण्याच्या पद्धतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यास १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकी रक्कम अटी, शर्तीला अधीन राहून अार्थिक वर्ष २०१९-२०पासून पुढील पाच वर्षांत समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या यथास्थिती भविष्यनिर्वाह निधी किंवा लागू असणाऱ्या निवृत्तिवेतन याेजनेच्या खात्यात जमा करता येणार अाहे.
मनपा प्रशासनाने राज्य शासनाच्या नियमानुसार १ जानेवारी २०१६ पासून लागू करून प्रत्यक्ष वेतनात १ जुलै २०१९ पेड अाॅगस्ट २०१९ पासून सुरू करण्याचे अादेश द्यावेत, अशी मागणी केली अाहे. या मागणीसाठी अध्यक्ष जितेंद्र चांगरे, सुरेश सांगाेले, मनाेहर तेजी, महादेव कुमावत, तुषार चांगरे यांनी धरणे अांदाेलन केले. कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.जी. पाटील, के.टी. काेळी यांनी धरणे अांदाेलनात सहभाग घेतला.