महागाईचा आगडोंब ! सलग १० व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

0

मुंबई :   आज गुरुवारी सलग दहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. देशात पहिल्यांदाच पेट्रोलने शंभरी गाठली तरी पेट्रोलियम कंपन्यांची कमाईची भूक भागलेली नाही. आज कंपन्यांनी पेट्रोल दरात ३४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली.

 

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.३२ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८७.३२ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.१९ रुपये आहे.

 

दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८९.८८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८०.२७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.९८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.३३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.११ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.३६ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९२.८९ रुपये असून डिझेल ८५.०९ रुपये झाला आहे.राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात बुधवारी पेट्रोलने शंभरी गाठली होती. देशभरात पहिल्यांदाच पेट्रोल १०० रुपयांवर गेले होते. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी, मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात प्रिमियम पेट्रोल (XP) १०० रुपयांवर गेले आहे.

 

दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीने ६५ डॉलरची पातळी ओलांडली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ६५ डॉलर आहे. त्यात १.८ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या १३ महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे. याआधी २१ जानेवारी २०२० रोजी ब्रेंट क्रूडचा भाव ६५ डॉलर प्रती बॅरल होता.

Leave A Reply

Your email address will not be published.