मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा…!

0

संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र , या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली असून भारताची प्रतिष्ठाही राखली आहे. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांनी डॉ. दातार हे खरोखरच अल अदील (भला माणूस) आहेत या शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
सौदी अरेबियामध्ये जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले हे भारतीय कामगार करोना व लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, काहींच्या नोकऱ्या गमावल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करुन गुजराण करत होते, तर काहीजण निर्धन झाल्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्याने अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरुन नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली होती. तुरूंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकुळ झाले होते. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांत आले होते.

डॉ. धनंजय दा यांना हे समजताच त्यांचे मन हेलावले. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका अशा शेजारी देशांनी त्यांच्या कामगारांना लगेचच घरी नेण्याची व्यवस्था केली, पण भारतीय कामगार मात्र चार हिने निष्कारण तुरूंगात अडकून पडल्याचे समजताच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी देशबांधवांच्या मदतीला धावून जाण्याचा निश्चय केला. संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया हे वेगवेगळे देश असल्याने एका देशातून दुसरीकडे पाठपुरावा करण्याचे काम तितकेसे सोपे नव्हते. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत (कॉन्सुलेट) जेद्दाह मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरुंगवासातून सोडल्यास सर्वाना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली. सौदी अरेबिया प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. भारत व सौदी अरेबियादरम्यान सध्या विमान वाहतूक बंद असल्याने सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करत या सर्व कामगारांना आपल्या सौदीया एअरलाइन्स या अधिकृत विमानसेवेद्वारे भारतात आणून पोचवले, तर कामगारांची जेद्दाह विमानतळापर्यंत वाहतूक, वैद्यकीय तपासणी व खाण्या-पिण्याची पूर्ण जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. यातील ४५१ कामगार सौदीया एअरलाइन्स च्या २ विशेष फ्लाईट्समधून दिल्ली विमानतळावर तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. दातार म्हणाले, आखाती देशांत अडकलेल्या निर्धन भारतीय कामगारांचा विमान तिकीटाचा, खान-पानाचा व वैद्यकीय चाचणीचा पूर्ण खर्च उचलून त्यांना सुखरुप मायदेशी पाठवण्याची मोहीम आम्ही राबवत आहोत. आमच्या अल अदील समूहाच्या कंपनी सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ५००० गरजूंना हे साह्य देऊन भारतात रवाना केले आहे. मी व्यवसायाबरोबरच आखाती देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार यातही सक्रिय आहे आणि खरेतर मी विशेष काही केलेले नाही कारण संकटाच्या काळात आपल्या बांधवांची मदत करणे हा माणुसकीचा व भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोचून आपल्या कुटूंबियांसमवेत समाधानात व सुरक्षित राहतील याचाच मला खूप आनंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.