जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव यांच्यातर्फे प्राचार्य डॉ.किसन पाटील आणि प्रा.भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.दोन्ही साहित्यिकांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राचार्य डॉ.किसन पाटील यांचे दिनांक दोन मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. खानदेशात आणि उभ्या महाराष्ट्रात साहित्यिक आणि समीक्षक म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केली . महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जळगाव शाखेचे ते क्रियाशील कार्याध्यक्ष होते. आपल्या काळात त्यांनी मसाप तर्फे विविध नावीन्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.
त्यांना मसापचे उपाध्यक्ष प्रा. भास्कर पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभत होते. दोन्ही साहित्यिकांनी मसापचे कार्य समाजाभिमुख आणि साहित्याभिमुख करण्यासाठी आपले योगदान दिले. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कार्यकारणी पुणे येथून श्री मिलिंद जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या श्रद्धांजली सभेत व्याख्यानमाला सुरू करण्यासंदर्भात आणि मसापच्या इतर महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा आणि निर्णय घेण्यात येणार आहेत.
तसेच मसाप जळगाव शाखेचे कार्य पुढे अविरत सुरू राहणेसाठी नवीन कार्यकारीणी गठीत करण्यासंदर्भात चर्चा व निर्णय होणार आहे. तरी दिनांक २७एप्रिल २०२१ मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या ऑनलाईन सभेला मसापच्या जळगाव शाखेच्या सभासदांनी उपस्थिती द्यावी,असे आवाहन मसापचे अध्यक्ष प्रा.ए.पी. चौधरी व मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी केले आहे.