मुंबई :- वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण लागू राहावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन आज सकाळी मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
पीजी मेडिकल प्रवेशाबाबत कॅबिनेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सोमवारी सही केली. त्यामुळे आता पीजी प्रवेशाला आणि एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण लागू होणार. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ठिय्या मांडला होता.विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान दिलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळली. अखेर मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारनं अध्यादेश काढला. अध्यादेशाला राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केल्याची नोटीस सीईटीच्या अधिकृत वेबसाइटवर काढल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं.